या जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी जाहीर ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता.. खरीप हंगाम २०२५ मध्ये अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, उत्पादनातील ही घट अधिकृतपणे निश्चित करण्यासाठी ‘अंतिम पैसेवारी’ जाहीर होणे अत्यंत महत्त्वाचे असते. शासनाकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देताना किंवा पीक विम्याची रक्कम निश्चित करताना ही पैसेवारी एक महत्त्वाचा ‘ट्रिगर’ म्हणून काम करते. सध्या राज्यातील विविध जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यास सुरुवात झाली असून, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांची आकडेवारी समोर आली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची सरासरी अंतिम पैसेवारी ४७.८१ पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे, जी ५० पैशांपेक्षा कमी आहे. तालुकानिहाय आकडेवारी पाहिल्यास, छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ४६.७ पैसे, पैठणमध्ये ४६.११ पैसे, फुलंब्रीत ४९ पैसे आणि वैजापूर तालुक्यात ४७.७३ पैसे अशी नोंद झाली आहे. तसेच गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, कन्नड आणि सोयगाव या उर्वरित तालुक्यांमध्येही पैसेवारी ४८ पैशांच्या आसपास आहे. ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असणे हे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे दर्शक असून, यामुळे या भागातील शेतकऱ्यांना विविध सरकारी सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.




















