रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; राज्यात ढगाळ वातावरण, पहा सविस्तर अंदाज
महाराष्ट्रावर रविवारी (ता. २१) हवेचा दाब १०१२ हेप्टापास्कल इतका कमी राहील. त्याचाच अर्थ किमान व कमाल तापमानात वाढ होऊन थंडीची तीव्रता कमी राहील. मात्र सोमवारी (ता. २२) महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात १०१४ हेप्टापास्कलपर्यंत वाढ होईल. याचाच अर्थ किमान व कमाल तापमानात मध्यम स्वरूपात घसरण होईल. थंडीचे प्रमाण वाढेल. मंगळवार ते शनिवार (ता. २३ ते २७) या ५ दिवसांत हवेचा दाब १०१२ हेप्टापास्कल इतका कमी राहून कमाल व किमान तापमानात वाढ होईल. थंडी मध्यम स्वरूपात राहील. रविवारी (ता. २१) महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील.
महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत कमाल सापेक्ष आर्द्रतेत घट होईल. हवामान थंड व कोरडे राहील. वाऱ्याच्या दिशेत बदल होत असल्याने थंडीत चढ-उतार जाणवेल. किमान तापमान १२ अंश सेल्सिअसपर्यंत राहिल्यास ऊस पिकात साखरेचे प्रमाण वाढून साखर कारखान्यांच्या रिकव्हरीत वाढ होईल. तसेच हरभरा, गहू अशा रब्बी पिकांची वाढ चांगली होऊन या वर्षी उत्पादन चांगले मिळू शकेल. सध्याचे हवामान सर्व रब्बी हंगामातील पिकांना पोषक राहील. आंबा पिकास मोहर लवकर येईल. हवामान स्थिर राहील. मोठे हवामान बदल जाणवणार नाहीत.
अरबी समुद्र व हिंदी महासागराच्या पाणी पृष्ठभागाचे तापमान २८ अंश सेल्सिअस राहील, तर बंगालचे उपसागराचे पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. हे सरासरीच्या जवळपास असल्याने समुद्री भागात हवामान स्थिर राहील. मोठे हवामान बदल जाणवणार नाहीत. प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान पेरूजवळ १९ अंशांपर्यंत, तर इक्वेडोरजवळ ते २४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले असल्याने ‘ला निना’ चा प्रभाव नाही. त्यामुळे कोणतेही मोठे हवामान बदल जाणवणार नाहीत. हवामान स्थिर व रब्बी पिकाच्या वाढीसाठी अनुकूल राहील.